Friday 9 December 2022

मेला होता तो उंदीर

 दोन उंदीर ताकाच्या भांड्यात पडले.

जगाच्या दृष्टीने एका उंदराने पाय मारले, ताकावर लोणी आलं आणि तो वाचला. 


सगळ्यांनी त्याची गोष्ट शाळेत पाठ केली. 

प्रयत्नांती परमेश्वर फळ्यावर लिहिलं गेलं.. एक अंतिम सत्य म्हणून.


की सातत्याने एकाच भिंतीवर डोकं अपटा, कालांतराने ती भिंत पडेल. 

पण मेला होता तो उंदीर खरंच प्रयत्न सोडून मेला होता?


की काही तास पाय मारून त्याला वाटलं, हे आंधळे पाय मारणं बास झालं.


 परिस्थिती हातात घेऊ.


आपण उंदीर आहोत, कुरतडत रहाणे हा आपला स्वभावधर्म आहे, ना की आंधळे पाय मारणं.. 


मग या प्रयत्नात मरण आलं तरी बेहत्तर..

तळाशी जाऊन भांड्याला भोक पाडून बाहेर पडू.


भांडं पितळी होतं म्हणून जगला होता तो उंदीर गोष्टीचा नायक बनला.


पण हेच जर प्लास्टिकच्या भांड्यातल्या तेलात पडले असते तर?


भांड्यात या वेळी कीतीही उंदीर असते तरी

मेला होता तो उंदीर, जगला होता त्या असंख्य उंदरांचा तारणहार होऊन जगला असता..

No comments:

Post a Comment