Tuesday 24 January 2017

प्रवासी

शरीर-रथाचे आपण  सारथी
Depression व elation त्याची चाकं.
त्यात उजवं- डावं नाही, दोन्ही महत्वाची.
जितकी मोठी- सशक्त,
तितका प्रवास लांब, तितका खोल.

रस्ता सारखा नसतोच
कधी सुंदर हिरवीगार कुरणं
कधी काट्याकुट्याचा खडबडीत, धुळीचा रस्ता
कधी अनपेक्षित वळण, तर कधी कंटाळवाणा एकसुरी.
जेव्हा फाटा येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो
सोपा रस्ता निवडावा की अवघड?
धोपट मार्गाने जावे का स्वतःचा मार्ग शोधावा?
कोणताही रस्ता चुकीचा नसतो
फक्त प्रवास वेगळा होतो, अनुभव वेगळे असतात
पण त्यामुळे शेवटी प्रवासीच बदलतो.

एकदा एक चाक डग खातं, एकदा दुसरं
कधी सारथी गुहेत थंड निपचित पडतो,
तर कधी मनाचे वारू मुक्त, चौखूर उधळतो

निसर्गाने मुक्तहस्ते सर्वत्र उधळलेला मेवा..
वेळ क्षणिक असतो,
कधी भूक मेली म्हणून रित्या पोटाने बसतो
कधी अधाशीपणे तडस लागेपर्येंत खातो

कसली ही भूक, जी संपतच नाही,
किती सुंदर हा प्रदेश, पाय येथून निघतच नाही

एक अदृश्य उंदीर सतत telomere कुरतडत असतो
त्याच्या चिकटीपुढे नतमस्तक प्रवासी, चेतना बहाल करतो, करावीच लागते. पर्यायच नसतो.
एक नवा telomere मागे ठेवून उंदराला हरवू पहातो
उंदीर त्यालाही मम म्हणून दात लावतो.
ही कुरतड आदिम काळापासून चालू असते

शेवटी आपण वणवण थांबून या सुंदर प्रदेशाच्या कुशीत चिरनिद्रा घेतो.
पोहऱ्यातलं पाणी परत आडात पडतं.
काही चुकार पाणी सहप्रवाश्यांच्या डोळ्यांत आसरा घेतं,
 पण आता प्रवास संपला या जाणिवेने ते ही मुकाट बाहेर येतं