Friday 11 November 2016

मरण - आयुष्य स्विकारल्याचा पूर्णविराम.


कोणतं मरण त्रासदायक?

विषाने आलेलं, सुरीने आलेलं, टांगून, आपटून, फरफटून आलेलं, दुसऱ्याकडून आलेलं..


की शून्य नजरेने..आयुष्यातून काय काय वजा झालं, याचा सुरकुतलेल्या हाताने हिशेब लावत, एकाकी.. खुर्चीवर बसून, आपल्या प्रेमाच्या माणसांच्या फोटोवरची धूळ आणि सुकलेले हार पाहत, वर्तमानाशी जमवून घेता येत नसल्याने, भूतकाळात रममाण होत.. आपलं ओज ओसरून गेलेलं, ताकद संपलेली, शरीराला रोग लागलेले, आज आपले जे लोक आहेत त्यांनी जुनं म्हणून अडगळीत एका कोपऱ्यात फेकून दिलेलं..त्यात हा लोचट वेळ जाता जात नाही, कंटाळा..अगदी मरणाचा कंटाळा... कंटाळ्याचाही कंटाळा..मग तुम्ही अदृष्टाकडे भीक मागणार, की बाबा रे! सोडव एकदाचं..तेव्हा अदृष्टही तुमच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणार..
    आणि केव्हातरी अचानक.. "धप्पा! तुझा डाव संपला."
 "आता नवे गडी, नवं राज्य."


त्या पेक्षा अंगात धमक असताना, समाधानाच्या कडेलोटावर, आपल्या लोकांना आपण अजून हवे असताना, हवे असलेले भोग मनसोक्त भोगून, त्यातला पुरेसा वाटा मागे ठेवून, व्यवस्थित असक्तीपूर्वक वागून (नीट तयार होऊन, आवडतं संगीत लावून, सांद्र प्रकाशात, डोळ्यांसमोर सूर्य अस्ताला जात असताना, नाकाला जंगलाचा दाट वास असताना, त्वचेवर किंचित काटा वाऱ्याने फुललेला, पानांची सळसळ..बाकी शांतता. आत आणि बाहेर. डोळे त्या लालसर सूर्यबिंबकडे एकटक. सावकाश हात पिस्तुलाकडे..कानशिलाजवळ थंडगार नळीचा स्पर्श. त्या खालची शीर जरा जास्तच थडथडते (fear of unknown).
 
डोळे, कान, नाक, त्वचा सगळे एकरूप झालेले..एकच संज्ञा..

"निसर्गाने मांडलेलं वैविध्य केवढं मोहक आहे..अजून बरंच पाहता आलं असतं.. पण आजवर जेवढं पाहिल त्याने भरून पावलो. जे जे बरं-वाईट भोगलं, या शरीरामुळे शक्य झालं, मी जे काही मिळवलं ते माझ्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर, संपूर्ण किंमत देवून. म्हणून मला माझ्या आयुष्याचा अभिमान आहे!"

   सूर्यकोर शेवटची दृष्टीआड होत असताना, एक शेवटचा विचार..

"या जगण्यावर..या मरण्यावर..शतदा प्रेम करावे!"

भरभरून घेतलेला श्वास.
एक शेवटचा आवाज.

क्लिक.