Thursday 4 April 2019

असाही पाऊस पडावा..




चातकाप्रमाणे एकट्यानेच माळरानावर असावं..
ढगांनी विजांच्या झंकाराने वाद्य लावून घ्यावीत..
आभाळभर कलकलाट करणाऱ्या थव्याने,
वेगवेगळ्या फांद्यांवरती गपचूप जागा निवडाव्यात..
वारा, ऊन, सावली, थेंबांची मैफिल सुरू व्हावी..

पावसाच्या कमी जास्त लयीवर ढगांनी गडगडाटाचा ठेका धरावा..
वाऱ्याने मधूनच सरीच्या स्वरमंडलावरून सर्रकन बोटं फिरवावीत..
त्याला वृक्षवेलींनी सळसळून दाद द्यावी..


कोण्या अनाम हातांच्या फटकाऱ्यांवर..
कडकडाट, गडगडाट, संततधारांची
सिम्फनी तयार व्हावी..

सुरांनी विलंबित लयीतून द्रुतगतीत जावं आणि गत वाढत जाऊन अखेर नादाची लय तालाच्या वेगात विलीन व्हावी..

द्रुतगतीचं संगीत संपल्यावर शांत सुरावट कानात घुमत रहावी तशी..
संभोगाचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर
वातावरणाने आचक्या अचक्याने आनंद सोसत
संपृक्तपणे निपचित पडावं..

कधीतरी असाही पाऊस जगवा,
कधीतरी आत्म्यानेही चिंब भिजावं..