Tuesday 17 April 2018

बा मना, सुधाकरा..


थपडा खात खात चुका सुधारू
म्हणता म्हणता..
गालच बथ्थड, बधीर होत गेले..



गणितं सोडवताना पायरी चुकली? 
गृहीतकं चुकली की 
सोडवायच्या पद्धतीच चुकल्या?

इकडे समासात कर्तव्य-जबाबदाऱ्यांवर
नवनवे हातचे चढत राहिले..



स्वतःकडे पाहण्याची एक त्रयस्थ दृष्टी आली..
त्या डोळ्यांनी पाहता पाहता..
खरेपणावरच झापड आली..


इतके दिवस निदान मनात तरी अपराधी भाव होते..
निर्लज्जपणाने संथपणे पसरत..
सावकाश लचके तोडत तोडत..
ते जिवंत न्यायी मनही खावून टाकले..

Sunday 8 April 2018

अदृष्टाच्या वाटा

 

   काही लोकांच्या घरी धूळ येतच नाही की काय अशी शंका येते. कधीही जा, पसारा नसतो..

आपण उगीचच आगाऊ यक्षासारखी परिक्षा घ्यावी म्हणून टाचणी मागितली की..

"उजवीकडच्या खोलीत अग्नेय दिशेला करडया कपाटातल्या 'शिवणाचा डबा' असा स्टिकर लावलेल्या कुकीजच्या डब्यात नाडयांच्या गुंडीमागे सात टाचण्या आहेत, त्यातली उजवीकडून दूसरी तीक्ष्ण आहे. ती घ्या" असं उत्तर आल्यावर मला माझं उकिरड्यासारखं घर डोळयांसमोर येतं...

मी पाय पोटाशी  घेवून जमिनीवर कोसळून ढसाढसा रडू लागतो. मी का रडतोय याचं कारण सांगितल्यावर "बापरे!" असं उत्तर येतं आणि स्वच्छ फरशीवर स्वतःचं प्रतिबिंब पाहून मला तळ्याकाठी बसल्याचा भास होतो, आणि मी अंतर्मुख होवून भान विसरतो..


कचऱ्याच्या डब्याजवळचा नेम चुकलेला कागदाचा बोळा, धूळ बसलेली केरसुणी-केरभरणं, गादीवर गर्दी केलेले कपडे, त्याखालची ढेकणांची शाळा;त्यात नुकतंच दाखल झालेलं इटुकलं पांढरं पिल्लू, कसंतरीच रॅपर फाडलेली नुकतीच बलात्कार झाल्यासारखी शून्याकडे डोळे लावलेली मऊ बिस्किटं,शेवाळं साचलेला संडास...


हे सगळे मी खिरापत असल्यासारखे माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले.. कोणत्यातरी अगम्य, फक्त व्यंजनांच्या भाषेत केस ताठ करणारे अघोरी मंत्र म्हणू लागले.. मला हालता का नाही येत?? हे दोरखंड कुठून कोणी केव्हा बांधले? या सगळयाचा काय असेल शेवट? तेवढयात लोणच्याने माखलेल्या चमच्याने डोळयांत राख फुंकली..

मी वर्गात उभा होतो.. देशपांडेबाई मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने निर्भत्सना करत होत्या..सगळा वर्ग मला हसत होता..मी परत बारा वर्षांचा झालो होतो..मी आत्ता स्वप्नात आहे?आधीचं स्वप्न होतं? तळव्यांना घाम जाणवला, मी खिडकीबाहेर पाहिलं, रस्त्यावरचं भटकं कुत्रं टक लावून थेट माझ्याकडेच पहात होतं..

माझ्याशी नजरानजर झाल्यावर ते विव्हळल्यासारखं रडू लागलं.. तिथेच क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाने त्याच्या पाठीत दगड हाणला..त्याची कळ माझ्या पाठीत जाणवली आणि मी बाकावर चक्कर येवून पडलो..

डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया जाणवल्या, बाबा रडणाऱ्या ऋताची समजूत काढत होते..

"अगं आता उतरला आहे त्याचा ताप आता, धोका टळला आहे,  येईल तो शुद्धीवर थोडयाच वेळात"