Thursday 4 April 2019

असाही पाऊस पडावा..




चातकाप्रमाणे एकट्यानेच माळरानावर असावं..
ढगांनी विजांच्या झंकाराने वाद्य लावून घ्यावीत..
आभाळभर कलकलाट करणाऱ्या थव्याने,
वेगवेगळ्या फांद्यांवरती गपचूप जागा निवडाव्यात..
वारा, ऊन, सावली, थेंबांची मैफिल सुरू व्हावी..

पावसाच्या कमी जास्त लयीवर ढगांनी गडगडाटाचा ठेका धरावा..
वाऱ्याने मधूनच सरीच्या स्वरमंडलावरून सर्रकन बोटं फिरवावीत..
त्याला वृक्षवेलींनी सळसळून दाद द्यावी..


कोण्या अनाम हातांच्या फटकाऱ्यांवर..
कडकडाट, गडगडाट, संततधारांची
सिम्फनी तयार व्हावी..

सुरांनी विलंबित लयीतून द्रुतगतीत जावं आणि गत वाढत जाऊन अखेर नादाची लय तालाच्या वेगात विलीन व्हावी..

द्रुतगतीचं संगीत संपल्यावर शांत सुरावट कानात घुमत रहावी तशी..
संभोगाचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर
वातावरणाने आचक्या अचक्याने आनंद सोसत
संपृक्तपणे निपचित पडावं..

कधीतरी असाही पाऊस जगवा,
कधीतरी आत्म्यानेही चिंब भिजावं..

Saturday 16 March 2019

ते सर्जनशीलता काय असतं हो भौ?

   मी कधीतरी काहीतरी लिहीणार, ते वाचून मला जवळून न ओळखणारे लोक विचित्रपणाचे, विक्षिप्त असल्याचे वेगवेगळे शिक्के मारणार..

मी ते शिक्के सकारात्मकपणे विचित्र म्हणजे 'इतरांपेक्षा वेगळा' अशी समजूत करून घेऊन कपाळावर कौतुकाने मिरवणार..

हा दातात काही सलतंय पण जिभेला नेमकं सापडत नाही असा प्रकार काही दिवस चालणार..
मी काही दिवस सगळं कसं शुंदल शुंदल चालू आहे असं भासवणार..
सलणाऱ्या भागाजवळचाही आकार सावकाश सुजून मोठा होणार..


उद्रेकाने मी अजूनच काहीबाही लिहीणार..
ते मी इतरांसमोर उघड करणार..
त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येणार..
मी सर्वप्रथम स्वतःवर भयंकर शंका घेणार..
यथेच्च तोंडसुख घेणार..
माझीच आतल्या आत भरपूर निंदा-नालस्ती करणार..
या प्रकाराला मी 'न्यायीपणाचं' लेबल लावणार..
ना अमृत - ना विष असला काही नरसिंह तुकडा माझ्या अगडबंब अक्राळविक्राळ इगोला टाकणार..
तुकडा आधाश्यासारखा बकबक खाऊन त्याची भूक अजूनच खवळणार..

ते पाहून मला शिसारी येणार..
हे सगळं केव्हा थांबणार?
हताश होऊन मी स्वतःलाच विचारणार..

बघता बघता त्या इगोची आमिबासारखी दोन शकलं होणार..
नवा जन्मलेला इगो म्हणणार..

"तू शब्दच्छल करणार..
  तू 'ट' ला 'ट' जोडून यमक जुळवणार..
  तू जोडाक्षराचं भडक लिपस्टिक लावणार..
  तू अधे-मधे विनोद घालून फिसकन लाजल्याचा हिडीसपणा    करणार..
   तू पोकळ विनयाने मान झुकवणार, पण तेव्हासुद्धा cleavage दिसेल याची काळजी घेणार..
एकूण बरेच वाचक गटवून ते वासनांध नजरेने लिखाणाकडे पाहावेत यासाठी नवनव्या क्लुप्त्या शोधणार..
तू एक निर्ढावलेली वैचारिक रंडी आहेस!

आणि याचा तुला अभिमानही आहे?!

    उगीच जखमा सोलून पू- रक्ताने नक्षीकाम केलं की त्याला कोणी सुंदर म्हणत नाही. नेमकी कशाची नक्षी आहे, अभिव्यक्ती.. वगैरे भानगडीत लोकं पडत नाहीत. एकतर रक्त बघून त्यांना भोवळ येते किंवा पू बघून शिसारी. एखादा 'सर्वानंदी शहाणा: चला फेर धरून नाचूगाऊ' प्रकारचा म्हणतो, "अरे तुझ्या प्रेतामधून रक्त, पू काय काढत बसलायस?"
ते बघ बाहेर इंद्रधनुष्य किती छान आहे!

आपणही बापडे रंगांधळेपणाकडे कानाडोळा करून "होय रे, या दृष्टिकोनातून मी इंद्रधनुष्य बघितलंच नव्हतं कधी, बाकी इंद्रधनुष्याकडे एकटक पाहिलं तरी माझ्यासमोर माझं रक्ताने माखलेलं प्रेत पडलं आहे या वस्तुस्थितीत काही बदल होत नाही बघ! किंवा हा सुध्दा एक नकारात्मक दृष्टीकोनच आहे बहुतेक! धन्यवाद!"  मला एक विनोद आठवला..

दोन मित्र असतात, पाहिल्याचा पाय खूप दुखत असतो. काही केल्या वेदना कमी होत नसतात. मग दुसरा मित्र त्याच्या हाताला गोळी मारतो आणि म्हणतो, आता पाय दुखला तरी जाणवणार नाही.. ख्याक ख्याक!

हा कसला विनोद?!

खरा विनोद तर पुढे आहे..

तो गोळी लागलेला पहिला मित्र हसत हसत बंदूक हातात घेतो आणि त्या दुसऱ्या मित्राच्या डोक्यात गोळी घालतो. आणि एकटक इंद्रधनुष्याकडे बघत बसतो..

त्याला एकदम जाणवतं आयुष्य खूप सुंदर आहे..!


नवा जन्मलेला इगो शेवटचा प्रयत्न म्हणून खलील जिब्रान ची वाक्य फेकतो..


Travel and tell no one,
 live a true love story and tell no one,
 live happily and tell no one, 
people ruin beautiful things




नको बाहेर काढू तुझं लिखाण कोणासाठी, 
नको मागू भीक वाचकाच्या प्रतिसादाची
राहू देत वही तशीच जिला कोणाचा स्पर्श झाला नसेल,
      अगदी मनाच्या आतल्या कप्प्यातलं असं काही असावं म्हणतात एकट्याचं, 
      मग ते कितीही भंपकपणाचं का असेना!

पण तोवर कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नसल्याने भुकेने खवळलेला मोठा इगो शेवटी ट्या नव्या जन्मलेल्या इगोची हाडं कडाकडा फोडून जिवंत असतानाच कचाकचा चावून गिळून टाकतो. समाधानाने ढेकर देतो.. 



      आणि थोड्याच वेळात त्याला परत अस्वस्थ वाटू लागतं कारण त्याच्या विभाजनाची प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली असते..