Friday, 2 February 2018

मी आणि कविता

मी माझ्याचसाठी लिहितो,
मी जरा स्वगतच बोलतो

हाताचे अदृष्टाशी बोलताना,
उचंबळून हातवारे करतो

मधूनच झपाझप पाय टाकतो,
अशक्य अस्वस्थ-अधीर होतो

आपापलाच भानावरही येतो,
स्वतःलाच वेडा ठरवून स्वतःलाच हसतो

स्वतःसाठीएक कुंपण तयार करतो,
ओलांडलं की स्वतःलाच शाबासकी देतो
तसाच राहिलो तर स्वतःवरच चिडतो

उगीचच गहन विचारांचा आव आणून,
फिलॉसॉफिकल हिडिसपणा करतो

नाकाचा शेंडा ध्रुवताऱ्याकडे लावतो,
तुटता तारा दिसला की भीक मागू नको
म्हणून स्वतःलाच दटावतो

सुमार लिखाणाचे बोळे भिरकावतो,
सुरुकुत्यांच्या प्रश्नचिन्हाकडे दुर्लक्ष करतो

मी फक्त स्वतःसाठीच लिहितो,
अशी माझी मीच समजुतही काढतो!



Tuesday, 24 January 2017

प्रवासी

शरीर-रथाचे आपण  सारथी
Depression व elation त्याची चाकं.
त्यात उजवं- डावं नाही, दोन्ही महत्वाची.
जितकी मोठी- सशक्त,
तितका प्रवास लांब, तितका खोल.

रस्ता सारखा नसतोच
कधी सुंदर हिरवीगार कुरणं
कधी काट्याकुट्याचा खडबडीत, धुळीचा रस्ता
कधी अनपेक्षित वळण, तर कधी कंटाळवाणा एकसुरी.
जेव्हा फाटा येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो
सोपा रस्ता निवडावा की अवघड?
धोपट मार्गाने जावे का स्वतःचा मार्ग शोधावा?
कोणताही रस्ता चुकीचा नसतो
फक्त प्रवास वेगळा होतो, अनुभव वेगळे असतात
पण त्यामुळे शेवटी प्रवासीच बदलतो.

एकदा एक चाक डग खातं, एकदा दुसरं
कधी सारथी गुहेत थंड निपचित पडतो,
तर कधी मनाचे वारू मुक्त, चौखूर उधळतो

निसर्गाने मुक्तहस्ते सर्वत्र उधळलेला मेवा..
वेळ क्षणिक असतो,
कधी भूक मेली म्हणून रित्या पोटाने बसतो
कधी अधाशीपणे तडस लागेपर्येंत खातो

कसली ही भूक, जी संपतच नाही,
किती सुंदर हा प्रदेश, पाय येथून निघतच नाही

एक अदृश्य उंदीर सतत telomere कुरतडत असतो
त्याच्या चिकटीपुढे नतमस्तक प्रवासी, चेतना बहाल करतो, करावीच लागते. पर्यायच नसतो.
एक नवा telomere मागे ठेवून उंदराला हरवू पहातो
उंदीर त्यालाही मम म्हणून दात लावतो.
ही कुरतड आदिम काळापासून चालू असते

शेवटी आपण वणवण थांबून या सुंदर प्रदेशाच्या कुशीत चिरनिद्रा घेतो.
पोहऱ्यातलं पाणी परत आडात पडतं.
काही चुकार पाणी सहप्रवाश्यांच्या डोळ्यांत आसरा घेतं,
 पण आता प्रवास संपला या जाणिवेने ते ही मुकाट बाहेर येतं

Friday, 11 November 2016

मरण - आयुष्य स्विकारल्याचा पूर्णविराम.


कोणतं मरण त्रासदायक?

विषाने आलेलं, सुरीने आलेलं, टांगून, आपटून, फरफटून आलेलं, दुसऱ्याकडून आलेलं..


की शून्य नजरेने..आयुष्यातून काय काय वजा झालं, याचा सुरकुतलेल्या हाताने हिशेब लावत, एकाकी.. खुर्चीवर बसून, आपल्या प्रेमाच्या माणसांच्या फोटोवरची धूळ आणि सुकलेले हार पाहत, वर्तमानाशी जमवून घेता येत नसल्याने, भूतकाळात रममाण होत.. आपलं ओज ओसरून गेलेलं, ताकद संपलेली, शरीराला रोग लागलेले, आज आपले जे लोक आहेत त्यांनी जुनं म्हणून अडगळीत एका कोपऱ्यात फेकून दिलेलं..त्यात हा लोचट वेळ जाता जात नाही, कंटाळा..अगदी मरणाचा कंटाळा... कंटाळ्याचाही कंटाळा..मग तुम्ही अदृष्टाकडे भीक मागणार, की बाबा रे! सोडव एकदाचं..तेव्हा अदृष्टही तुमच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणार..
    आणि केव्हातरी अचानक.. "धप्पा! तुझा डाव संपला."
 "आता नवे गडी, नवं राज्य."


त्या पेक्षा अंगात धमक असताना, समाधानाच्या कडेलोटावर, आपल्या लोकांना आपण अजून हवे असताना, हवे असलेले भोग मनसोक्त भोगून, त्यातला पुरेसा वाटा मागे ठेवून, व्यवस्थित असक्तीपूर्वक वागून (नीट तयार होऊन, आवडतं संगीत लावून, सांद्र प्रकाशात, डोळ्यांसमोर सूर्य अस्ताला जात असताना, नाकाला जंगलाचा दाट वास असताना, त्वचेवर किंचित काटा वाऱ्याने फुललेला, पानांची सळसळ..बाकी शांतता. आत आणि बाहेर. डोळे त्या लालसर सूर्यबिंबकडे एकटक. सावकाश हात पिस्तुलाकडे..कानशिलाजवळ थंडगार नळीचा स्पर्श. त्या खालची शीर जरा जास्तच थडथडते (fear of unknown).
 
डोळे, कान, नाक, त्वचा सगळे एकरूप झालेले..एकच संज्ञा..

"निसर्गाने मांडलेलं वैविध्य केवढं मोहक आहे..अजून बरंच पाहता आलं असतं.. पण आजवर जेवढं पाहिल त्याने भरून पावलो. जे जे बरं-वाईट भोगलं, या शरीरामुळे शक्य झालं, मी जे काही मिळवलं ते माझ्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर, संपूर्ण किंमत देवून. म्हणून मला माझ्या आयुष्याचा अभिमान आहे!"

   सूर्यकोर शेवटची दृष्टीआड होत असताना, एक शेवटचा विचार..

"या जगण्यावर..या मरण्यावर..शतदा प्रेम करावे!"

भरभरून घेतलेला श्वास.
एक शेवटचा आवाज.

क्लिक.

Saturday, 30 July 2016

कमरेवरची वळी

 


होय, तीच ती. आपल्याला inferior वाटायला लावणारी. उड्या मारल्या की लडलड हलणारी. अश्वत्थाम्यासारखी पोटावर चिरंजीव असलेली (जर मला पोटावर एखादी मस किंवा चामखीळ असती तर वळीला मी अश्वत्थामाच म्हटलं असतं) पण माझी वळी भुंडी आहे. शिंग नसलेल्या unicorn (bike नव्हे) सारखी. म्हणजे घोडाच. साधा घोडा हो, चाबूक मारला की पाठीतून फटाक् आणि तोंडातून चौकोनी दात दाखवत हीहीहीही: असा आवाज येतो तो.

   तर वळीला अश्वत्थाम्याची उपमा का, तर.. उड्या मारा, चाला, पळा, जिम लावा, जीवनसत्वे-प्रथिने-शुद्ध पाण्यावर रहा, उपाशी मरा. पण वळी आहेच. जरा व्यायाम केला आणि वाटलं की अरे, वळी आता हातात येत नाही आहे. पण लगेच आनंदाने 'अंगावर मूठभर मांस' चढतं. जेलीसारखी वळी खिजवत रहाते.

   हद्द होते, तुम्ही चिडता. काट्याने काटा काढावा तसे तेलकट पदार्थ खाता, खुशीने मोदका-पुरणपोळयांवर 3-4 चमचे साजूक रवाळ तूप सोडता. पण वळी तेही विष पचवते आणि बेडकीसारखी फुगून तिच्या घश्यासारखी हालत राहते.

   हताश होऊन आपण जाडी लपवू पाहतो, ढगळ कपडे घातले की कोणाला कळणार नाही असं आपल्याला वाटतं.

   पण marketing वाल्याना नेमका वास लागतोच. पाहता क्षणी वरून-खालून लाळ सुटेल अशा सुंदरीला ते tv वर बोलती करतात,
   "मी मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतली hippopotamus होते, माझ्या पाठीवरचे शुभ्र बगळे मला गब्बू-ढब्बू म्हणून खूप चिडवायचे. मी पण मोठ्ठा 'आ' करून खूप रडायचे. अश्रूंनी माझं तळं भरायचे, आज त्या तळ्याला अटलांटीकचा महासागर म्हणतात. पण मी शेजारच्या काकूंच्या सांगण्यावरून 'सेकंदात बारीक' ही गोळी खाल्ली. लगेच मला शिंक आली. शिंकल्यावर पहाते तो काय! मी एक सुंदरी झाली होते (आणि आधीपेक्षा गोरीसुद्धा)..

   आपल्याला ती जाहिरात बघून परत बरचसं inferior आणि थोडंसं आशावादी वाटायला लागतं. पण add च्या शेवटी terms & conditions apply असं असतं. त्यात पहिलीच condition असते, गोळी 100% काम करण्यासाठी तुम्ही आधी आफ्रिकेतील हिप्पो असणं गरजेचं असतं. आणि possible side effects म्हणून hair loss to erectile dysfunction असे वरपासून खालीपर्येंत होण्याऱ्या व्याधी असतात.

   तुम्ही सिद्धार्थासारखे(बुद्धांचा गौतम) उदास होता. आता या पोटावर उभ्या असलेल्या प्रश्नाची उकल शोधायचं म्हणाल तर आजूबाजूच्या सिमेंटच्या जंगलात बोधिवृक्षही नसतो.

   तुमची उदासी तुमचे मित्राशिरोमणी पकडतात.
 म्हणतात, "अरे, उदास का एवढा? चल बिअर पिऊ."
तुम्ही ठाम नकार देता.

 "नाही रे, परवाच दारू सोडली आहे कायमची."

"अरे, beer cafe मध्ये happy hours चालू आहेत. ₹30,000 च्या total bill वर एक pint free. पण 4.00 च्या आत जावं लागेल, त्यासाठी आत्ताच निघावं लागेल."

   मुद्दा लगेच पटतो. आपल्या तोंडात लाळ वाढलेली जाणवते. भयंकर तहान लागते.

   ज्या मैत्रिणीवर तुमचा डोळा असतो तीपण लाडिकपणे "ए चल ना रे" असं म्हणते आणि ती उंटावरची काडी ठरते.

   80% प्यायलेली beer मूतावाटे बाहेर पडते, 20% तुमची वळी पिते आणि अजून मोठी होते.

   तुम्ही झिंगता, बरळता आणि दुसऱ्या दिवशी डोकं धरून बसता.

   हळूहळू वळीला तुम्ही income tax, मृत्यू यांसारखी अटळ गोष्ट म्हणून स्वीकारता. तुमच्या पोटावर तिचं स्थान पक्कं होतं.

          कुणीतरी म्हणलेलंच आहे,
         
        " खाणाऱ्याने घास घ्यावे,
           वाढणारीने वाढत जावे.
           खाणाऱ्याने एक दिवस वाढणारीचा,
           छातीत कळवळून घास व्हावे. "

Sunday, 26 June 2016

पहिला स्पर्श, प्रेमाचा.

हातात हात, डोळ्यांत डोळे
छातीत धडधड, ओठ ओले ओले

वीज ताबा घेते, तुला ओढून घेतो
ओठांची चव अलगद टिपून घेतो

तोंडाने निषेध, पण डोळे हसतायत
पोटात आपल्या फुलपाखरं नाचतायत

स्पर्श तुझा इतका मोहवणारा,
थरारून आनंद व्यक्त करणारा,

एवढया थंडीत घाम कसा येऊ शकतो?
तो लोचट चंद्र आपल्या आरपार कसा पाहू शकतो?

घाबरू नको प्रिये मी आहे ना?
खोलवर पहा डोळ्यांत, आधार घे माझा,
मीही हात धरून ठेवला आहे ना!

फारच नवीन भावना आहे ही,
डोक्यात माझ्या चांद तारे, हरणे, हत्ती
उपमा शोधतो आहे,
पण हा जो केसांचा धुंद करणारा वास आहे ना,
तो म्हणतोय वेड्या उपमा कसली देतोस?
अनुभावसारखं मोहक दुसरं आहे काही ?

संस्कार, संस्कृती, मान-अपमान
गळून गेले आपल्या वस्त्रासोबत

पहिल्या स्पर्शाने जिंकून घेतले तुला,
प्रेमाचा पुढे-मागे होणारा
अलवार झुला.

काळ इथेच थांबवा.
नश्वरतेला पुरून दशांगुळे,
आपल्यासारखा स्पर्शमय उरावा.

एका हाताने वाजवलेली टाळी..

रक्त ढवळतं, कानशिलं गरम होतात
अनाहूत अस्वस्थ वाटतं, कधी भितीही वाटते
दिवस ढळत असतो, क्षण-क्षण सुटत असतात
कसलीतरी मानसिक बंधनं काचू लागतात
डोळ्याच्या कोपऱ्यातून लॅपटॉप दिसतो
बऱ्यापैकी मोकळा वेळही असतो..

"चिरतरूण राहणार मी" उगीच पुटपुटतो.
छातीत धडधडायला लागतं..
Pornhub लिहिलं जातं..
एका नव्याच दुनियेत प्रवेश होतो..

सुंदर्या माझ्यासाठीच तयार असतात, सगळीकडे..
वेगवेगळ्या प्रकारचे वक्ष..फिगर..योनी..आवाज,
कातडी..केसांचे विविध रंग..

मला डी-मार्टमध्ये फळीवर सर्व मांडल्यासारखं वाटतं,
चिकित्सकपणे हव्यात्या प्रकारच्या स्त्रीयांना
 बास्केटमध्ये टाकलं जातं..
निवडीचं सर्वार्थाने स्वातंत्र्य असतं..
'customer is king' हे इथे खऱ्या अर्थाने लागू होतं!

बागेत, स्वयंपाकघरात, निजलेल्या, बांधलेल्या..
मनाविरुद्ध आलेल्या, घर पाहायला आलेल्या..
गुपित फोडू नये म्हणून शरीर देवू करणाऱ्या..
मित्राची बायको, आई, बहीण, शेजारीण..
मैत्रिण, गर्लफ्रेंड, शाळकरी मुली..
काहीही चालतं,
आदीम भुकेला फक्त एक मादी हवी..

वासनेचा कोंभ तरारतो..
त्याला अलगद हातात घेतो..
आणि व्यक्तिमत्वाची अदलाबदल होते.

मीच त्यांच्याशी संभोग करू लागतो..
दिवसभर पाहिलेल्या,
त्यातल्या आवडलेल्या मुलींशी सुद्धा..
बेबंद, बेभान, संपूर्ण पृथ्वी गदागदा हलवतो..


एकच ध्यास..

मृत्यूची भीती पार करणारा,
सर्व दैन्य, दुःख, अपराध विसरायला लावणारा,
थोड्या वेळापूर्ती मरणप्राय शांतता भोगायला लावणारा,
डोळ्यांसमोर अंधारी, श्रुती सुन्न करणारा,
तो हवाहवासा ऊत्सर्ग..




Thursday, 23 June 2016

Tell me harry



   काय उकाडा आहे, आज tubbath पक्का. मी कॉलेजमध्ये वैराण उन्हातून चालताना ठरवलं. बरेच दिवस मनासारखी आंघोळ झाली नाही. नुसतं शरीर स्वच्छ करत आलो, संडासात लेंडी सोडल्यावर कशी तळाशी settle होते तसा टबात शिरणार आहे. आणि मस्त विरघळून जाणार. काहीतरी घशात खवखव होईल असं संगीत आणि जीव घुसमटेल इतकं गरम पाणी.

आज साबणाचा फेस करावासा वाटत नाही, टबात बसून समोरच्या कोनाड्याकडे बघत खूप कसलातरी विचार करायचाय. पाण्यात संपूर्ण तोंड बुडवून तो गंभीर आवाज ऐकायचाय. मागच्या ground मध्ये पालापाचोळा जाळला आहे, डोळ्यांना जाणवेल इतका उग्र आहे. लावावी का खिडकी? पण आता कपडे काढले आहेत. घरी कोणी नाही. जाऊ का नैसर्गिक पोशाखात बाहेर? मोठा झाला आहेस 24 वर्षांचा घोडा वगैरे वगैरे. मागच्या वर्षी हे सगळं ठीक होतं.

    पाणी चांगलंच गरम आहे, थोड्या भाज्या, मीठ, मिरपूड, चिकन चे तुकडे, आणि हसऱ्या चेहऱ्याने हे मिश्रण हाताला रग लागेपर्येंत ढवळा. लवकर शिजण्याकरता चिकन च्या तुकड्यांशी लाडेलाडे बोला आणि microwave oven मधून 15 मिनिटात काढून घ्या.(चिकन ला आपण स्वतंत्र आहोत असा भास होऊ देत, त्याला ओव्हन मध्ये मजा येऊ देत, पण 15 मिनटं खूप झाली, नाहीतर चिकन वाया जाईल, अगदी हाताबाहेर. आपल्याला हवं तितकं नेमकं शिजणार नाही. मग समाजासमोर तुम्ही तुमचं चिकन कसं मिरवणार?) तर असं सूप सुरर सुरर आवाज काढत भुर्के मारत प्या. किंवा joey सारखं mmmm... soup! असं म्हणा.

    टबात पाय ठेवल्या ठेवल्या, arthour weasley ने सवाल केला, "tell me harry, what is the function of a rubber duck?"
Harry म्हणाला, "त्याचं काय आहे काका.. muggle लोकांच्यामध्ये बऱ्याच गैरसमजुती आहेत, आपली मुलं कॉलेज मध्ये शिकायला जातात, पैशांपेक्षा मूल्य मोठी, वाहतुकीचे नियम पाळा, tubbath रबरी बदकाशिवाय पूर्ण होत नाही वगैरे...पण त्याला काही अर्थ नाही. एकदा बदक आणि एकदा बदकाशिवाय अंघोळ करा, तुम्हीच ठरवा त्याचा कसा आणि काय उपयोग आहे ते. कोणी सांगावे तुम्हाला गवसेल त्याचा नेमका काय उपयोग आहे ते! अगदी युरेका म्हणत नागडे बाहेर सुद्धा याल. (मी च्यायला टॉवेल विसरला!!)
कुणी यायच्या आत गेलंच पाहिजे बाहेर, खिडकी पण लावावी आणि टॉवेल पण आणावा हळूच. न घाबरता.
फरहान अख्तर म्हणालाच आहे, "आझाद होकर लेहरों की तरह बहना सिखो.."

(अशक्य गरम पाणी निवेपर्येंत फालतू उद्योग म्हणून ही पोस्ट केली.)