Saturday, 30 July 2016

कमरेवरची वळी

 


होय, तीच ती. आपल्याला inferior वाटायला लावणारी. उड्या मारल्या की लडलड हलणारी. अश्वत्थाम्यासारखी पोटावर चिरंजीव असलेली (जर मला पोटावर एखादी मस किंवा चामखीळ असती तर वळीला मी अश्वत्थामाच म्हटलं असतं) पण माझी वळी भुंडी आहे. शिंग नसलेल्या unicorn (bike नव्हे) सारखी. म्हणजे घोडाच. साधा घोडा हो, चाबूक मारला की पाठीतून फटाक् आणि तोंडातून चौकोनी दात दाखवत हीहीहीही: असा आवाज येतो तो.

   तर वळीला अश्वत्थाम्याची उपमा का, तर.. उड्या मारा, चाला, पळा, जिम लावा, जीवनसत्वे-प्रथिने-शुद्ध पाण्यावर रहा, उपाशी मरा. पण वळी आहेच. जरा व्यायाम केला आणि वाटलं की अरे, वळी आता हातात येत नाही आहे. पण लगेच आनंदाने 'अंगावर मूठभर मांस' चढतं. जेलीसारखी वळी खिजवत रहाते.

   हद्द होते, तुम्ही चिडता. काट्याने काटा काढावा तसे तेलकट पदार्थ खाता, खुशीने मोदका-पुरणपोळयांवर 3-4 चमचे साजूक रवाळ तूप सोडता. पण वळी तेही विष पचवते आणि बेडकीसारखी फुगून तिच्या घश्यासारखी हालत राहते.

   हताश होऊन आपण जाडी लपवू पाहतो, ढगळ कपडे घातले की कोणाला कळणार नाही असं आपल्याला वाटतं.

   पण marketing वाल्याना नेमका वास लागतोच. पाहता क्षणी वरून-खालून लाळ सुटेल अशा सुंदरीला ते tv वर बोलती करतात,
   "मी मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतली hippopotamus होते, माझ्या पाठीवरचे शुभ्र बगळे मला गब्बू-ढब्बू म्हणून खूप चिडवायचे. मी पण मोठ्ठा 'आ' करून खूप रडायचे. अश्रूंनी माझं तळं भरायचे, आज त्या तळ्याला अटलांटीकचा महासागर म्हणतात. पण मी शेजारच्या काकूंच्या सांगण्यावरून 'सेकंदात बारीक' ही गोळी खाल्ली. लगेच मला शिंक आली. शिंकल्यावर पहाते तो काय! मी एक सुंदरी झाली होते (आणि आधीपेक्षा गोरीसुद्धा)..

   आपल्याला ती जाहिरात बघून परत बरचसं inferior आणि थोडंसं आशावादी वाटायला लागतं. पण add च्या शेवटी terms & conditions apply असं असतं. त्यात पहिलीच condition असते, गोळी 100% काम करण्यासाठी तुम्ही आधी आफ्रिकेतील हिप्पो असणं गरजेचं असतं. आणि possible side effects म्हणून hair loss to erectile dysfunction असे वरपासून खालीपर्येंत होण्याऱ्या व्याधी असतात.

   तुम्ही सिद्धार्थासारखे(बुद्धांचा गौतम) उदास होता. आता या पोटावर उभ्या असलेल्या प्रश्नाची उकल शोधायचं म्हणाल तर आजूबाजूच्या सिमेंटच्या जंगलात बोधिवृक्षही नसतो.

   तुमची उदासी तुमचे मित्राशिरोमणी पकडतात.
 म्हणतात, "अरे, उदास का एवढा? चल बिअर पिऊ."
तुम्ही ठाम नकार देता.

 "नाही रे, परवाच दारू सोडली आहे कायमची."

"अरे, beer cafe मध्ये happy hours चालू आहेत. ₹30,000 च्या total bill वर एक pint free. पण 4.00 च्या आत जावं लागेल, त्यासाठी आत्ताच निघावं लागेल."

   मुद्दा लगेच पटतो. आपल्या तोंडात लाळ वाढलेली जाणवते. भयंकर तहान लागते.

   ज्या मैत्रिणीवर तुमचा डोळा असतो तीपण लाडिकपणे "ए चल ना रे" असं म्हणते आणि ती उंटावरची काडी ठरते.

   80% प्यायलेली beer मूतावाटे बाहेर पडते, 20% तुमची वळी पिते आणि अजून मोठी होते.

   तुम्ही झिंगता, बरळता आणि दुसऱ्या दिवशी डोकं धरून बसता.

   हळूहळू वळीला तुम्ही income tax, मृत्यू यांसारखी अटळ गोष्ट म्हणून स्वीकारता. तुमच्या पोटावर तिचं स्थान पक्कं होतं.

          कुणीतरी म्हणलेलंच आहे,
         
        " खाणाऱ्याने घास घ्यावे,
           वाढणारीने वाढत जावे.
           खाणाऱ्याने एक दिवस वाढणारीचा,
           छातीत कळवळून घास व्हावे. "

No comments:

Post a Comment