Friday 9 March 2018

मी आणि जॉगिंग


  आजपासून नियमीत फिरायला जाणार असं ठरवून बाहेर पडलो. मस्त दूतर्फा झाडी आहे माझ्या कॉलनीच्या आतल्या सर्व वाटांवर.

   माझी melancholic playlist, घामाने भिजलेले तरी न सटकता कानाशी थिजलेले हेडफोन्स, लयबद्ध हातांच्या हालचाली, स्वतःलाच कळेल न कळेल असे वरखाली हालणारे नुकतंच बाळसं धरलेले माझे मॅनबूब्ज (मूब्ज?) आणि विचारांचा खिस पाडत चाललेले मुक्त विचार.

   एखादं विनाकारण उभं असलेलं कुत्रं सोडलं तर बाकी कोणीही नव्हतं.

   श्वास लागला. अजून वेग वाढवला. 20 पावलांवर थांबलो. मग गुडघ्यावर हात ठेवून धापा वगैरे..

   गाणं बदलावसं वाटलं. खिशात हात घातला. क्लबहाऊस  समोरच्या झाडाखाली बुचाच्या फुलांचा खच पडला होता, त्यातली चार विनाकारण खिशात टाकली होती. तशीच मूठ नाकाला लावून वास घेतला. हात झटकला. एक लोचट फूल चिकटून बसलं होतं पंज्याला. मग ते तर्जनी आणि अंगठयाने पकडून देठ चोळायचा चाळा. जणू नाकातून ताजे उकरून काढलेले ओलसर मेकूडच!

   मी आवाजाच्या रोखाने उजवीकडे पाहिलं. ती जॉगिंग करत येत होती. एवढंसं नाक हट्टाने उडवून पुढे गेली. गोल कंस उलटे ठेवल्यासारखी तिची कंबर आणि छोटया मडक्यासारखं ढुंगण या गोष्टी पाहून घेतल्या. तिचा "घामट आहे पण कुबट नाही, परफ्यूम आहे पण अनैसर्गिक नाही" असला काहीतरी मिश्र नरसिंह वासही आला.

   जी काही नजरानजर झाली, त्यात मी तिच्याकडे 'एक सुंदर मुलगी' अशा नजरेने पाहतोय हे तिला माहिती होतं. किंबहुना वळणावरुन येताना 'मला खात्रीच होती तू माझ्याकडे पाहशील याची, आणि पाहतो आहेस तर तुच्छतेने पाणउतारा केलाच पाहिजे तुझा' असा प्रकार घडला.

   हे सगळं 5-6 सेकंदात घडलं. मला वरमल्यासारखं झालं. अस्सं काय! आता पुढच्या फेरीत मी पायाखालच्या किंवा समोरच्या रस्त्याचं जोरदार निरिक्षण करणार आहे. पाहणारच नाही मुळीच तुझ्याकडे. रात्रीचे 10.38 झाले आहेत. आपण दोघेच आहोत jogging track वर. आत्ता माझ्याशिवाय बाकी कोण देणार तुला तुझ्या सौंदर्याची पावती?
 
   पण नजरानजर व्हायला (किंवा टाळायला) साधारण अशाच वळणावर तिला ओलांडलं पाहिजे. अजून पूढे तीन लागतील.

 पण पहिल्याच वळणावर गाठलं तर 'हा रेप करायला आला' असं समजून ती घाबरेल.

दूसऱ्या वळणावर मी डेस्परेट वाटेन.

तिसऱ्या वळणावर, म्हणजेच द्रॅकवरचं साधारण दीड अंतर पार करुन गाठावं हे उत्तम.

   तिचा वेग साधारण 12-14 km/hr असेल. ती बऱ्यापैकी दमलेली वाटली. वाटेत थांबली असेल तर उत्तमच. नाहीतर मला सुरुवातीला किमान 22km/hr ने पळून ती नजरेच्या टप्यात आली की relative velocity 3-4 km/hr ने जास्त ठेवावी लागेल, म्हणजे सावकाश वेगाने ओलांडत थंडपणे दुर्लक्ष करता येईल. ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात. माझ्या physics च्या सरांना उचक्या येत असतील.

   पण एवढा अट्टाहास कशासाठी? वर एवढं करुन तिच्याकडे खरंच पाहणार नाही की काय मी? 'पुरुषीपणा' पासून क्षणाचेही स्वातंत्र्य नाही विसरलास काय? Testosterone च्या बेडया आहेत की दोन!

   ठीक आहे. पाहीनच. पण.. सावधपणे. पाहिलंय याचा पत्ता लागू देणार नाही. का असतो याचाही पत्ता मुलींना? मैत्रिणींशी बोललं पाहिजे एकदा या विषयावर.

   मुली थेट बघत नाहीत ते माहिती आहे मला. मान सरळ ठेवून डोळयांच्या कोपऱ्यातून चोरटं पाहतात. नजर पकडली की लगेच समोर बघायचं. एकमेकांकडे नैसर्गिकपणे पाहणे ही साधी गोष्टसुध्दा complicate करायची! त्यात कबड्डी, लपंडाव मधे आणायचा.

   हिने आधी असंच पाहिलं असेल का? सालं लक्ष नव्हतं माझं. बरी गाणी ऐकत विचारांची समाधी लागली होती. त्या अप्सरेने पृथ्वीवर आणलं.

   नजरेच्या टप्प्यात आल्यावर मी वेग कमी केला. तिनेही. मागे वळून पाहिलं. पण मी ठरल्याप्रमाणे दुर्लक्ष केलं.

   टॉपवर "just do it"  लिहिलं होतं. Nike हरामखोर!

   "I thought I am the only one who likes to run late at night" जिभेने धोका दिला. उगीचच 15-20 वाक्यांची उधळपट्टी झाली. मग कळालं TT खेळणाऱ्या जमदग्नी काकांची पाहुणी आहे. गपचूप good night म्हणून अपराध्यासारखा घरापर्यंत सोडून आलो.

(यातील माझ्यासकट सर्व पात्रं काल्पनीक आहेत)