Sunday 30 August 2020

ती..

 कपाळाकडे काय पाहते आहेस अशी?


ती: जेवताना प्रत्येक घास चावलास की तुझ्या कपाळावरची शीर उडते. सेक्सी वाटतं ते मला.


जसा तुझा पंजा आणि निमुळती होत जाणारी लांबसडक बोटं.


ज्यांनी माझ्या चेहऱ्यावर आलेले केस सारखे मागे करत रहावेस आणि बोटांचा ओझरता स्पर्श क्षणभर रेंगाळून त्वचेत झिरपावा!


चिडू नकोस..

पण तुझी बोटं, तुझे गहिरे डोळे, 

दूपारी 'हा मुलगा आवडला का' विचारलंस त्याची दाढी,

 रस्त्याकडेला खोऱ्याने माती ओढणारे रापलेले पिळदार दंड, 

FC रोडवर बिनधास्त धुराची वर्तुळं काढणाऱ्या कॉलेजच्या मुली..

 या सगळयांचं एक मिश्रण होवून एक अनाम संवेदना छेडते मला..


कारण तुझे डोळे फक्त माझ्या शरीराचे बोल ऐकण्यात दंग आहेत. मी काहीही संगितलं आत्ता तरी पटेल तुला. 

म्हणूनच मला खरं बोलायचं आहे. 


आपण सहप्रवासी आहोत फक्त. माझं प्रेम आहे तुझ्यावर बहुतेक. माझा असा अहं च्या चिंध्या उडवणारा स्पष्टवक्तेपणा आवडतो तुला हे तुझ्या समंजस नजरेतून कळतंय मला..


त्याच नजरेचा आधार आहे मला,

म्हणूनच तुझ्यासमोर सर्वार्थाने निर्वस्त्र होवू शकते मी.. 


आधी विचारांचा संभोग आणि सहभोग होवू देत..


 विचार आणि कृती यांमधला काळ शक्यतितका ताणू..


अधीर होवू देत संपूर्ण शरीर..


तुझ्यातला फक्त शारिरीक वखवख माहिती असलेला आदिमानव जन्मूदे..

आहेतच तुझे डोळे, त्याची दाढी, तुझं घामाने डवरलेलं कपाळ, ते उन्हातले दंड..

फुटू देत ओलसर लाटा अशाच, येवो भरती..

जोवर मी हिसक्या- हिसक्यांनी क्लांत अंधारत नाही.. 

आणि हेच मरण असेल तर आता मला भिती नाही..

जोवर इंद्रियांचा संपूर्ण ताबा नाही..

ड ड डायलेमा ड

 स्वतःच स्वतःची मारून घेणे, आणि मग माझ्यामध्ये काय शिल्लक राहिलं हे निरखून पाहणे हा इतका भयंकर छंद जडला आहे..


निखाऱ्याची ऊब पण पाहिजे आणि चव पण तेव्हाच पाहिजे


असं काहीतरी..


कांदा सोलत बसायचा, 

आणि  आतमध्ये अवरणात काही खास निघेल म्हणायचं..

आतला पंधरा कंद हातात धरून 

सिगरेट पेटवून उगीच शून्यात नजर लावायची..

या जगात ना कांद्याची कमी ना टपऱ्यांची..

माझीच छाती लवकर भरून येते आताशा,

नजरही अधू होते आहे आजकाल..

दूरच्या स्वप्नापेक्षा जवळची भाकरी चटकन दिसते


#धुळाक्षरे

सोमवारचा चहा

 मस्त थंडी असते, वाफाळता चहा आणि बिस्किटं. 


10 मिनिटांचा स्वर्ग..


पण कणा तुटला तरी चालेल, याला हा आनंदसुद्धा मिळू द्यायचा नाही असं म्हणून एखादं बिस्कीट चहाच्या कपात आत्महत्या करतं.


काहीतरी बिघडल्यासारखी जाणीव होते. पण एकटक इंद्रधनुष्य बुबुळांवर आपटून आपटून थोड्या वेळापुरतं शुंदल शुंदल अंधत्व आणलं जातं. आपल्याला खूप काम आटपायचं असतं..


बिस्कीटाचा कबंध चहाच्या तळातून तुकड्या तुकड्याने ओरबाडून काढुन निर्मम हबश्यासारखा तो चघळून फस्त करताना,


"सरळ तळाशी काय गेला असा! अरे, बुडून मरताना दोन हात पाय तरी मारायचे..


नाही, म्हणजे मरण टळलं असतं असं नाही.. पण आम्हाला बघायला मजा आली असती जरा" .. तुम्हाला मचमच करावीशी वाटते


मेंदूवरच्या विस्कटलेल्या बुळबुळीत गोगलगायी तुम्ही निटनेटक्या करता..


विचार नेमके नियंत्रित, महाकाय निर्बुद्ध.


शरीर एक स्नायू. कारण ही वेळ कृतीची असते!


"कृतिशून्य लोक निर्बुद्ध, बेकार असतात" अश्या नावाचं पंख नसलेलं पिल्लू शाळेतून तुमच्या खांद्यावर आलेलं असतं, त्याला आता बाकदार चोच आणि अणकुचीदार नख्या आलेल्या असतात. ज्या माणक्यापर्येंत घुसलेल्या असतात


कोणतीही कृती करा. उद्योगी राहा! 


दिवसभर तळवा चाटा. लक्षात ठेवा! कोणताही तळवा छोटा नसतो.


अलबत तुमच्या कृतीतून सातत्य झळकत राहिलं पाहिजे!


चला तर मग! कामाला लागू..