मस्त थंडी असते, वाफाळता चहा आणि बिस्किटं.
10 मिनिटांचा स्वर्ग..
पण कणा तुटला तरी चालेल, याला हा आनंदसुद्धा मिळू द्यायचा नाही असं म्हणून एखादं बिस्कीट चहाच्या कपात आत्महत्या करतं.
काहीतरी बिघडल्यासारखी जाणीव होते. पण एकटक इंद्रधनुष्य बुबुळांवर आपटून आपटून थोड्या वेळापुरतं शुंदल शुंदल अंधत्व आणलं जातं. आपल्याला खूप काम आटपायचं असतं..
बिस्कीटाचा कबंध चहाच्या तळातून तुकड्या तुकड्याने ओरबाडून काढुन निर्मम हबश्यासारखा तो चघळून फस्त करताना,
"सरळ तळाशी काय गेला असा! अरे, बुडून मरताना दोन हात पाय तरी मारायचे..
नाही, म्हणजे मरण टळलं असतं असं नाही.. पण आम्हाला बघायला मजा आली असती जरा" .. तुम्हाला मचमच करावीशी वाटते
मेंदूवरच्या विस्कटलेल्या बुळबुळीत गोगलगायी तुम्ही निटनेटक्या करता..
विचार नेमके नियंत्रित, महाकाय निर्बुद्ध.
शरीर एक स्नायू. कारण ही वेळ कृतीची असते!
"कृतिशून्य लोक निर्बुद्ध, बेकार असतात" अश्या नावाचं पंख नसलेलं पिल्लू शाळेतून तुमच्या खांद्यावर आलेलं असतं, त्याला आता बाकदार चोच आणि अणकुचीदार नख्या आलेल्या असतात. ज्या माणक्यापर्येंत घुसलेल्या असतात
कोणतीही कृती करा. उद्योगी राहा!
दिवसभर तळवा चाटा. लक्षात ठेवा! कोणताही तळवा छोटा नसतो.
अलबत तुमच्या कृतीतून सातत्य झळकत राहिलं पाहिजे!
चला तर मग! कामाला लागू..
No comments:
Post a Comment