Sunday, 3 September 2023

जगाला काय वाटेल

  'जगाला काय वाटेल'..


हा विचार आला

आणि,


लेखणीच्या सूक्ष्म टोकावर

शाई अंग चोरुन,

अवगुंठून थांबली..


कागद भकास कोऱ्या चेहेऱ्यानी 

सर्व काही समजल्यासारखे

घोळक्याने अधून मधून

फडफडत राहिले..


दिव्याचा प्रकाश उगीचच

प्रखर वाटू लागला..


कारण, 

एका लेखकाचा मृत्यू झाला होता.


#धुळाक्षरे

Friday, 10 February 2023

कालपटल

  आधी वाटायचं materialism नश्वर असतो..

आशा होती काही अस्पर्श गोष्टी चिरंतन राहतील..

म्हणून वस्तूपेक्षा अनुभवांना जास्त महत्व देत गेलो, निदान ते तरी आयुष्यभर सोबत असतील. 


पण cyclical depression च्या दोन तीन लाटांनी हेच दाखवून दिलं की अनुभव सुध्दा पुसले जातात..

जर पाटी कोरी रहात असेल, तर परत परत का लिहायचं? 

..की पुसली जावी म्हणूनच?


अंतिम काय आहे? 


पाटीवर लिहिणारा अनामिक हात?

की लांबलचक कालपटलावर कितीही डोकं अपटा, 

माझी पाटी कोरीच राहील हे सत्य?

Thursday, 29 December 2022

Resume

 भावनांचा गलिच्छ बाजार मांडणे हा ह खरा छंद आहे 

पण interview मध्ये विचारलं तर..

पुस्तकं वाचणे, 

खदाखदा हसणे, 

अशक्य ते शक्य करणारा स्वामी होणे,

 productivity स्त्रवणारा अथक leader असणे, 

न झालेल्या चुकांमधून भयंकर शिकणारा.. 

सतत पुढे पुढे..

 वर वर.. 

साक्षात प्रतीसूर्य.. 

नम्र team player आकाशगंगा..!


विचारचक्र

 मी अजून माझंच शेपूट पकडायचा प्रयत्न करतोय.


मग कधी उसंत मिळाली तर आभाळातल्या तेजाकडे बघायचा प्रयत्न करतो..


डोळे दिपल्यावर गच्च बंद करून भुंकत बसतो की तू खूप दाहक आहेस, अप्राप्य आहेस..


स्वतःला नि:सत्व म्हणवून शिक्कमोर्तब करावं तर अहंकार छाती फुगवतो..


आत डोकावून पाहिलं तर लोचट भीती बुबुळांना घट्ट मगरमिठी मारून बसते..


आणि मी त्या शेपटाच्या पांढरट टोकाकडे पाहत स्वतःभोवती गिरक्या घेत फिलॉसॉफी हेपलतो..


"हा नरक किंवा मृत्य तर नव्हे?"


#धुळाक्षरे

Friday, 9 December 2022

मेला होता तो उंदीर

 दोन उंदीर ताकाच्या भांड्यात पडले.

जगाच्या दृष्टीने एका उंदराने पाय मारले, ताकावर लोणी आलं आणि तो वाचला. 


सगळ्यांनी त्याची गोष्ट शाळेत पाठ केली. 

प्रयत्नांती परमेश्वर फळ्यावर लिहिलं गेलं.. एक अंतिम सत्य म्हणून.


की सातत्याने एकाच भिंतीवर डोकं अपटा, कालांतराने ती भिंत पडेल. 

पण मेला होता तो उंदीर खरंच प्रयत्न सोडून मेला होता?


की काही तास पाय मारून त्याला वाटलं, हे आंधळे पाय मारणं बास झालं.


 परिस्थिती हातात घेऊ.


आपण उंदीर आहोत, कुरतडत रहाणे हा आपला स्वभावधर्म आहे, ना की आंधळे पाय मारणं.. 


मग या प्रयत्नात मरण आलं तरी बेहत्तर..

तळाशी जाऊन भांड्याला भोक पाडून बाहेर पडू.


भांडं पितळी होतं म्हणून जगला होता तो उंदीर गोष्टीचा नायक बनला.


पण हेच जर प्लास्टिकच्या भांड्यातल्या तेलात पडले असते तर?


भांड्यात या वेळी कीतीही उंदीर असते तरी

मेला होता तो उंदीर, जगला होता त्या असंख्य उंदरांचा तारणहार होऊन जगला असता..

Sunday, 30 August 2020

ती..

 कपाळाकडे काय पाहते आहेस अशी?


ती: जेवताना प्रत्येक घास चावलास की तुझ्या कपाळावरची शीर उडते. सेक्सी वाटतं ते मला.


जसा तुझा पंजा आणि निमुळती होत जाणारी लांबसडक बोटं.


ज्यांनी माझ्या चेहऱ्यावर आलेले केस सारखे मागे करत रहावेस आणि बोटांचा ओझरता स्पर्श क्षणभर रेंगाळून त्वचेत झिरपावा!


चिडू नकोस..

पण तुझी बोटं, तुझे गहिरे डोळे, 

दूपारी 'हा मुलगा आवडला का' विचारलंस त्याची दाढी,

 रस्त्याकडेला खोऱ्याने माती ओढणारे रापलेले पिळदार दंड, 

FC रोडवर बिनधास्त धुराची वर्तुळं काढणाऱ्या कॉलेजच्या मुली..

 या सगळयांचं एक मिश्रण होवून एक अनाम संवेदना छेडते मला..


कारण तुझे डोळे फक्त माझ्या शरीराचे बोल ऐकण्यात दंग आहेत. मी काहीही संगितलं आत्ता तरी पटेल तुला. 

म्हणूनच मला खरं बोलायचं आहे. 


आपण सहप्रवासी आहोत फक्त. माझं प्रेम आहे तुझ्यावर बहुतेक. माझा असा अहं च्या चिंध्या उडवणारा स्पष्टवक्तेपणा आवडतो तुला हे तुझ्या समंजस नजरेतून कळतंय मला..


त्याच नजरेचा आधार आहे मला,

म्हणूनच तुझ्यासमोर सर्वार्थाने निर्वस्त्र होवू शकते मी.. 


आधी विचारांचा संभोग आणि सहभोग होवू देत..


 विचार आणि कृती यांमधला काळ शक्यतितका ताणू..


अधीर होवू देत संपूर्ण शरीर..


तुझ्यातला फक्त शारिरीक वखवख माहिती असलेला आदिमानव जन्मूदे..

आहेतच तुझे डोळे, त्याची दाढी, तुझं घामाने डवरलेलं कपाळ, ते उन्हातले दंड..

फुटू देत ओलसर लाटा अशाच, येवो भरती..

जोवर मी हिसक्या- हिसक्यांनी क्लांत अंधारत नाही.. 

आणि हेच मरण असेल तर आता मला भिती नाही..

जोवर इंद्रियांचा संपूर्ण ताबा नाही..

ड ड डायलेमा ड

 स्वतःच स्वतःची मारून घेणे, आणि मग माझ्यामध्ये काय शिल्लक राहिलं हे निरखून पाहणे हा इतका भयंकर छंद जडला आहे..


निखाऱ्याची ऊब पण पाहिजे आणि चव पण तेव्हाच पाहिजे


असं काहीतरी..


कांदा सोलत बसायचा, 

आणि  आतमध्ये अवरणात काही खास निघेल म्हणायचं..

आतला पंधरा कंद हातात धरून 

सिगरेट पेटवून उगीच शून्यात नजर लावायची..

या जगात ना कांद्याची कमी ना टपऱ्यांची..

माझीच छाती लवकर भरून येते आताशा,

नजरही अधू होते आहे आजकाल..

दूरच्या स्वप्नापेक्षा जवळची भाकरी चटकन दिसते


#धुळाक्षरे